नाशिक मिरर : नाशिक शहरात कोविड रुग्ण गुणाकार पध्दतीने वाढत आहे. सातपूर विभाग देखील याला अपवाद नाही. परंतु सातपूर परिसरातल्या नागरिकांसाठी सातपूर विभागात मनपाचे एक ही कोविड सेंटर व रुग्णालय नाही. परिणामी रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. सातपूर हा कामगार वर्गाचा परिसर आहे. या वर्गाची घरे अतिशय लहान व एक अथवा दोन खोल्या असलेली आहे.त्यामुळे कामगारांच्या घरातील एखादी व्यक्ती कोविड बाधित झाल्यास त्यांना होम क्वारंटाईन होणे शक्य होत नाही.त्याच बरोबर खाजगी रुग्णालयाचा आधार घेणे देखील पैशा अभावी अडचणीचे होत आहे.त्यामुळे सातपूर परिसरातील मध्यम व गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात या आजारामुळे त्रस्त आहे. या वर्गाला दिलासा देण्यासाठी सातपूर परिसरात कोविड सेंटर व रुग्णालय चालू करणे अत्यावश्यक आहे.
त्या अनुषंगाने सातपूर मधील जिजामाता शाळा या ठिकाणी कोविड सेंटर तातडीने चालू करावे व गंभीर रुग्णांसाठी शासनाचे राज्य कामगार विमा रुग्णालय मनपा साठी अधिग्रहित करून त्यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक सुविधा निर्माण करून या रुग्णालयात आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी उपचार देण्यात यावेत. तरी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या कडे प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सदस्य सलिम शेख, योगेश शेवरे ,व सचिन सिन्हा, योगेश लभडे, प्रकाश निगळ,सोपान शहाणे,विजय आहिरे यांनी निवेदन देऊन केली आहे.
