महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूच्या नूतनीकरण सोहळ्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) नाशिकमध्ये येत आहेत.
मुंबईतील राजभवन येथून शासकीय हेलिकॉप्टरने सकाळी साडेनऊ वाजता ते नाशिककडे प्रयाण करतील. सव्वादहा वाजता मानोरी येथील किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. तेथून वाहनाने ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मार्गस्थ होतील. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छतावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलचा उद्घाटन कार्यक्रम कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडेल. त्यानंतर दुपारी तीनपर्यंतचा वेळ राखीव असून, तीन वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
