हवामानाच्या अंदाजामुळे राष्ट्रपतींचा नाशिक ते त्र्यंबकेश्वर दौरा हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे; नियोजनात बदल, बंदोबस्ताचा ताण वाढणार!

नाशिक मिरर |वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असतानाच हवामानाच्या अंदाजामुळे नियोजनात बदल करण्याची वेळ आली आहे.

31 ऑक्टोबर रोजी नाशिकसह राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने राष्ट्रपतींचा नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास हेलिकॉप्टरऐवजी वाहनाने होणार असल्याचे समजते. या बदलामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला नव्याने नियोजन करावे लागणार असून, बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि मार्गावरील सुरक्षेचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

 

काय होते नियोजन?

सुरुवातीला ओझर विमानतळावरून राष्ट्रपतींचे विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर हेलिकॉप्टरने पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून वाहनाने रामकुंडावर आगमन, त्यानंतर हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला प्रयाण आणि कार्यक्रमानंतर पुन्हा नाशिकला परतण्याचे नियोजन होते. यासाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यासह हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंतच्या प्रवासाची रंगीत तालीमही पोलिसांनी घेतली होती.

 

मात्र, हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान नाशिकसह राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानचा प्रवास रस्तेमार्गे करण्याची तयारी सुरू आहे.

 

नव्याने नियोजन

राष्ट्रपतींचा दौरा रस्तेमार्गे झाल्यास संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करावी लागणार आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सुरक्षित हालचालींसाठी मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग, वाहतुकीतील बदल आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे. याशिवाय ताफा ज्या मार्गाने प्रवास करणार आहे, त्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक डागडुजी करणे आणि संपूर्ण मार्गाची रंगीत तालीम घेणेही पोलिस प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने कार्यक्रमस्थळावरील व्यवस्थेचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे.

Don`t copy text!