नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले, तसेच नदी संवर्धनासाठी स्वतंत्र ‘गोदावरी संवर्धन कक्ष’ स्थापन करून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीही केली. मात्र या सर्व दाव्यांना धक्का देणारी घटना सोमवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. बापू पुलाजवळ गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत तरंगताना आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी बापू पुलाजवळ नदीकाठी मोठ्या प्रमाणात मृत मासे पडलेले पाहून नागरिक अवाक झाले. रसायनमिश्रित पाणी आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, जलचरांचा अक्षरशः गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रभागातील नगरसेविका अंकिता शिंदे, उषा बेंडकोळी, कविता लोखंडे, तसेच अॅड. महेंद्र शिंदे आणि गोदावरी संवर्धनासाठी सातत्याने लढा देणारे राजेश पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त लोकप्रतिनिधींनी मृत मासे हातात घेऊन महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

नमुने तपासणीसाठी

नगरसेविका अंकिता शिंदे यांनी तातडीने महापालिकेचे उपायुक्त अजित निकत यांना पाचारण करत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मनीष महाजन यांनीही घटनास्थळी भेट देत नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. प्रदूषणामुळेच माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी नेमके कोणते रसायन पाण्यात मिसळले गेले होते हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

“प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे”

या घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी महापालिकेवर तीव्र टीका केली आहे.

नगरसेविका अंकिता शिंदे म्हणाल्या, “आम्ही वारंवार तक्रारी करूनही सांडपाणी रोखले जात नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर नदीत मासे मरत असतील, तर या संवर्धन कक्षाचा उपयोग काय? प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे.”

गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन खरोखर ठोस कारवाई करते का याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

बातम्या

Don`t copy text!