व्यवस्थापन ठरले अपयशी बारागाडा सोहळ्यात गर्दी अनियंत्रित
नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर परिसरातील शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने भवानी मातेच्या यात्रेत पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा सोहळा भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला. या अनोख्या आणि श्रद्धेच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील दहा हजारांहून अधिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी सुमारे ७:५५ वाजण्याच्या सुमारास श्री गणेशा मंगेश निगळ यांनी पारंपरिक वेशभूषेत बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली. अर्धनारी नटेश्वराच्या रूपात साकारलेल्या या धार्मिक विधीपूर्वी त्यांनी गावातील मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर तसेच औद्योगिक वसाहतीतील प्राचीन भवानी माता मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर त्र्यंबक रोडवर एकमेकांना बांधलेल्या बारा गाड्या ओढत विसावा स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मान त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.
या पारंपरिक सोहळ्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या परंपरेचे जतन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रोत्सव समिती व ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले. शांताराम निगळ, गोकुळ निगळ, प्रकाश निगळ, शिवाजी भंदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष भरत घाटोळ, कार्याध्यक्ष किरण निगळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परंपरा, श्रद्धा आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम असलेल्या या बारागाडा सोहळ्याने सातपूरकरांची सांस्कृतिक ओळख पुन्हा अधोरेखित केली.
व्यवस्थापन ठरले अपयशी बारागाडा सोहळ्यात गर्दी अनियंत्रित, तणाव :
बारागाड्या ओढण्याच्या मुख्य क्षणी प्रचंड गर्दी उसळल्याने नियोजन काही काळ विस्कळीत झाल्याचे दिसून आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत स्वयंसेवकांवर काठ्या उगारल्याची घटना घडली. त्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तत्काळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली.
