नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिक शहरातील कामगारनगर परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका घराच्या टेरेसवर गोणीत भरलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही काळापासून तो तेथे पडून असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कामगारनगर येथील साईबाबा मंदिराजवळील परिसरात रविवारी सायंकाळी नागरिकांना तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी स्थानिकांनी परिसराची पाहणी केली असता एका घराच्या टेरेसवर ठेवलेल्या गोणीत संशयास्पद वस्तू दिसून आली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यामध्ये मानवी मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नागरिकांनी तात्काळ सातपूर पोलिसांना माहिती दिली.

 

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

 

मृतदेह गोणीत भरून घराच्या टेरेसवर ठेवण्यात आल्याने या प्रकरणामागे घातपात अथवा खुनाचा कोन असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. मृतदेह घटनास्थळी कसा आणण्यात आला, तो तेथे कोणी ठेवला आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आडगाव परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवावी, असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले आहे.

 

या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील पुढील निष्कर्षांनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

बातम्या

Don`t copy text!