जिद्द, मेहनत आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
नाशिक मिरर वृत्तसेवा :
सध्या शहरासह परिसरात जाणवत असलेल्या गॅस टंचाईचा मोठा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह लहान व्यावसायिकांवरही होताना दिसत आहे. अनेक छोटे व्यवसाय गॅसअभावी ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर असताना, सातपूर परिसरातील एका अपंग दाम्पत्याने मात्र संकटावर मात करत जिद्दीने नव्याने उभारी घेतली आहे.
त्र्यंबक रोडलगत चहाचा छोटेखानी व्यवसाय करणारे अशोक बागुल आणि त्यांची पत्नी उषा बागुल हे दोघेही शारीरिक अडचणींवर मात करत कष्टाच्या जोरावर संसार चालवत होते. परंतु अलीकडेच निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची वेळ आली. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रोजच्या उत्पन्नाचा स्रोत बंद पडण्याची भीती निर्माण झाली होती.
अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता बागुल दाम्पत्याने पर्याय शोधत चुलीवर चहा बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र हळूहळू त्यांनी या पद्धतीत प्राविण्य मिळवले आणि पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, चुलीवर तयार होणाऱ्या चहाची चव ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून अनेक जण मुद्दाम त्यांच्या स्टॉलला भेट देत आहेत.
ग्राहकांकडून मिळणारा हा प्रतिसाद केवळ व्यवसायाला हातभार लावत नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासालाही नवी ऊर्जा देत आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही,” हा संदेश त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येतो.
दरम्यान, गॅस टंचाईचा फटका केवळ घरगुती वापरापुरता मर्यादित न राहता छोट्या व्यवसायांच्या उदरनिर्वाहावरही होत असल्याचे या उदाहरणातून समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
जिद्दीची खरी ताकद :
संकट कोणतेही असो, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यावर मात करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सातपूरमधील बागुल दाम्पत्य. त्यांच्या संघर्षातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
