नाशिक मिरर वेबटीम : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी रवींद्र भोये यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे युवराज कोठुळे यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मंगळवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी भोये यांनी दिली.
सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि.१७) सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे यांच्यासह रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, प्रभाकर मुळाणे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, शाम गावित, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे, हे संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपसभापतीपदासाठी रवींद्र भोये यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी बाजार समिती सचिव अरुण काळे, बांधकाम अभियंता रामदास रहाडे, सहायक सचिव आर. एन. घोलप व जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील राजेश आव्हाड उपस्थित होते.
