‘गोकुळ कोणाच्या बापाची मालमत्ता नाही’; अमूल आणि गुजरातचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका; गोकुळ वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
नाशिक मिरर :कोल्हापूर |
कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोकुळ दूध संघ पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर या निवड प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत या संपूर्ण प्रक्रियेला ‘लोकशाहीचा खून आणि रडीचा डाव’ असे संबोधले आहे. बेकायदेशीर पद्धतीने गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
राजू शेट्टी यांनी अध्यक्ष निवड प्रक्रियेवर आठ प्रश्न उपस्थित करत महायुती सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. गोकुळच्या चेअरमन निवडीत नियम आणि लोकशाही प्रक्रियेला बगल देऊन राजकीय सोयीने निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळ हा कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणि जनतेचा हक्काचा संघ असून, त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने मालकी हक्क गाजवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘गोकुळ कोणाच्या बापाची मालमत्ता नाही!’
गोकुळच्या महत्त्वावर भाष्य करताना शेट्टी म्हणाले की, गोकुळ हा कोल्हापूरच्या जनतेच्या मालकीचा आहे, कोणाच्या बापाचा नाही. पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी असलेल्या या दूध संघावर बाहेरील शक्तींचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजराती ब्रँड अमूलच्या घशात गोकुळ घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडद्यामागून खटाटोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी गुजरातच्या राजकीय आणि आर्थिक प्रभावावर टीका करताना, ‘गुजरात ही आजची ईस्ट इंडिया कंपनी आहे, महाराष्ट्र तिची वसाहत आणि देवेंद्र फडणवीस हे त्या कंपनीचे व्हाईसरॉय आहेत,’ असे जहरी विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन निर्णयावरही तीव्र नाराजी
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या न्यायालयीन घडामोडी आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाबाबतही राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांच्या दबावाला न्यायालयाने बळी पडू नये, अन्यथा सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होईल, असे ते म्हणाले. संबंधित निर्णय धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
अमित शाह यांना उपरोधिक टोला
महायुती सरकारने शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयावरही शेट्टी यांनी टीका केली. सरकारला अध्यादेश काढूनच सर्व काही करायचे असेल, तर आणखी एक अध्यादेश काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना स्वीकृत संचालक करा आणि त्यांनाच चेअरमन बनवा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
‘ईडीच्या भीतीला घाबरणार नाही; गोकुळसाठी संघर्ष करू’
गोकुळच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, कोल्हापूरची जनता कोणत्याही राजकीय दबावाला किंवा ईडीच्या भीतीला घाबरणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. सहकार क्षेत्राचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या राजकारणाला नवे वळण?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आता केवळ राजकीय पदाचा संघर्ष राहिलेली नाही, तर सहकार क्षेत्रातील स्वायत्तता, दूध उत्पादकांचे हित आणि राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा बनली आहे. राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या वादाला आणखी धार आली असून, महायुती सरकार या आरोपांना काय उत्तर देते आणि पुढील काळात गोकुळच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.