कार्बन नाक्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; सातपूर मधील दोन तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

सातपूर औद्योगिक वसाहतीत अपघाताची थरारक घटना; एका जखमीची प्रकृती चिंताजनक

नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ झालेल्या या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,धनंजय समाधान पगार (छत्रपती शिवाजीनगर सातपूर वय २१) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

या भीषण अपघातात राजेश कृष्णा भोये (वय २५, रा. निशाणखडक, ता. पेठ, जि. नाशिक) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भोये हा मंगळवारी सकाळी आपल्या एमएच १५ एलडी ३७८४ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच ४१ डीवाय ५७६३ क्रमांकाच्या दुचाकीची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

दुसऱ्या दुचाकीवर महेश दिलीप क्षीरसागर (वय २१, रा. गायत्री कॉलनी, अशोकनगर, सातपूर) आणि धनंजय समाधान पगार (वय २१, रा. शिवाजीनगर, सातपूर) हे दोघे प्रवास करत होते. दोन्ही दुचाकींची धडक इतकी भीषण होती की, राजेश भोये याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर महेश क्षीरसागर आणि धनंजय पगार हे दोघेही जखमी झाले होते त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महेश क्षीरसागर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मात्र, या भीषण धडकेत एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

 

दरम्यान, कार्बन नाका आणि म्हसोबा मंदिर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीत सकाळच्या वेळेत कामगारांसह वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपासानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.

Don`t copy text!