नाशिक : शहरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक शहरातील चार हॉटेलचे परवाने आणि एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले आहे. २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी आणि कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. यामध्ये अस्वच्छ परिसर, कीटकांचा प्रादुर्भाव, कच्चा माल अस्वच्छ पद्धतीने साठवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा तसेच उंदरांची विष्ठा आढळणे अशा बाबींचा समावेश आहे.
या चार हॉटेलचे परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत खालील चार हॉटेलचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
1. हॉटेल विहार – वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड.
2. हॉटेल श्यामसुंदर – सी रोड, एमआयडीसी, सातपूर.
3. हॉटेल तुषार मिसळ – असावरी चेंबर्ससमोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड.
4. हॉटेल महाराजा काठियावाडी – आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी.
कॅफे दुर्गाचे नोंदणी प्रमाणपत्रही निलंबित
हॉटेलवरील कारवाईसोबतच कृषीनगर येथील क्युबॉइड बिझनेस सेंटरमधील कॅफे दुर्गा या आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्रही निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच दिवसात एकूण पाच अन्न आस्थापनांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.
तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अन्नपदार्थ तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे समोर आले. काही ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव, कच्चा माल अस्वच्छ स्थितीत ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवणे तसेच उंदरांची विष्ठा आढळल्याने अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीत आढळलेल्या त्रुटींमुळे संबंधित आस्थापनांविरुद्ध परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतिक भड, किशोर चांदगुडे आणि संकेत येलमामे यांनी केली.
नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता राखली जाते की नाही, यावर प्रशासनाने नियमित लक्ष ठेवण्याची गरज या कारवाईतून अधोरेखित झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळत आहे.
दरम्यान, नाशिककरांनीही बाहेर खाद्यपदार्थ खाताना संबंधित आस्थापनांमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
Nashik Mirror | नाशिकची बातमी, विश्वासाने!

