नियुक्त्यांवरही होणार शिक्कामोर्तब
महापालिका परिवहन सिटी लिंक कंपनीच्या संचालक मंडळाची गुरुवारी (ता.२४) बैठक झाली. बैठकीत पहिल्या टप्प्यात पन्नास बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार यांची नियुक्ती झाली. एसटीचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. परिवहन कंपनीसाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकाऱ्याची शासनाकडून नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. कंपनीचे मुख्य लेखाधिकारी म्हणून महापालिकेचे उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावित यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. बसचे मंजूर दर, टर्मिनल उभारणी, आयटीएमएस यंत्रणा उभारणे, बसचालक व वाहकांची नियुक्ती आदींबाबत आढावा घेण्यात आल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाला बोलवण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या बससेवेचा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बससेवेचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांची तारीख निश्चित झाल्यावर नाशिक मनपा बससेवा प्रकल्पाचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण
नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाची असलेल्या नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. प्रवाशांची चढ उतार करून बस धावल्या. 1 ते 10 जुलै पासून प्रत्यक्ष बससेवेला सुरुवात होणार आहे.
या नऊ मार्गांवर धावणार बस
१) तपोवन ते बारदान फाटामार्गे सिव्हिल, सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर
२) तपोवन सिम्बायोसिस कॉलेजमार्गे पवननगर, उत्तमनगर
३) तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव
४) सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगडमार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरूळ, बोरगड
५) तपोवन ते भगूरमार्गे शालिमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प
६) नाशिक रोड ते बारदान फाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका
७) नाशिक रोड ते अंबड गावमार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे
८) नाशिक रोड ते निमाणीमार्गे जेल रोड टाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूर नाका, तपोवन
९) नाशिक रोड ते तपोवनमार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी
