नाशिक मिरर : सातपूरमधील आठ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय इसमास जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबतची अधिक माहिती अशी, की दि. 6 ऑक्टोबर 2018 रोजी अकिल गुलाब मणियार (वय 38, रा. आंबेडकरनगर भाजी मार्केट, सातपूर) याने एका आठ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केला होता व हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुला मारेल, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी अकिल गुलाब मणियार याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 377, 506 सह बाललैंगिक अत्याचार कलम 6, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा अधिक तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक आर. सी. अवतारे यांनी करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. या गुन्ह्याचा तपास चिकाटीने करत आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पोस्को कोर्ट) न्यायालय यांच्यासमोर झाली.
गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांना अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम 235 (2) अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले, तर पोलीस हवालदार पी. व्ही. पाटील व कोर्ट अंमलदार पोलीस नाईक एस. सी. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
