नाशिक मिरर : वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे सोमवार, दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त गोल्फ क्लब ( हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ) येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, अंकुश पवार, सलीम शेख, सुदाम कोंबडे, योगेश शेवरे, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, विशाल भावले, संदीप दोंदे आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच दिनकर पाटील यांचे समर्थक देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.
दिनकर पाटील हे मागील २५ वर्षापासून नाशिकच्या राजकारणात सक्रिय असून विविध पक्षात अनेक पदावर काम केले. दिनकर पाटील यांनी तीन वेळा मनपाचे नगरसेवक म्हणून तसेच सभागृहनेता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. महानुभाव पंथाचे राष्ट्रीय संमेलन भरविणे तसेच महानुभाव पंथाच्या प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या त्यांच्या प्रयत्नामुळेच मार्गी लागल्या आहेत. त्यांच्यामुळे या विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कामांमुळेच त्यांच्यावर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विश्वास केला आहे.
सिडको, सातपूर परिसरातील कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी आहे, अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सातपूर भागात त्यांनी अनेक विकास कामे केली असून आता मनसेमध्ये प्रवेश केल्याने पक्षांमध्ये देखील मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला असून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत देखील होत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात निर्धार मेळावा घेत दिनकर पाटील यांनी उमेदवारीवर ठाम असल्याचे दाखवून दिले असून वय थांबायचे नाही लढायचे आहे. लोकसभेला थांबलो, मात्र विधानसभेला थांबणार नाही, असेही पाटील म्हणाले.
दिनकर अण्णा म्हणाले की, मला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी दिल्याबद्दल तसेच माझ्यावर विश्वास दाखविल्या बद्दल माननीय राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मनापासुन आभार व्यक्त करतो. गेली ३५ वर्ष काँग्रेस आणि गेल्या ११ वर्षांपासून भाजपमध्ये काम करत होतो, नगरसेवक म्हणून १० वर्षापासून काम करतोय, अद्याप चुकीचे काम केले नाही. माझ्या बाजूने आज २० नगरसेवक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहेत. मला सभापतीपद, विधानसभा, महापौर शब्द देऊन संधी दिली गेली नाही. मला आता कोणत्याही उमेदवारावर टीका टिप्पणी करायची नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या सोबत सर्व जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आहे, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.
आमदार म्हणून मला नाशिकसाठी प्रचंड मोठे काम करायचे आहे, सभामांडप आणि खेळणी बसवणे हे काम नगरसेवकाचे असते, मला आमदार म्हणून सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योग व्यवसायाची भरभराट करावयाची आहे, बंद पडलेल्या कंपन्या तथा कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि ते करून दाखवील, मला रोजगार संधी उपलब्ध करून द्यायचे आहे, मोठी इंडस्ट्री आणायची आहे, असे त्यांनी सांगितले.

