सिंहस्थातील महत्वाच्या कामांमध्ये समाविष्ट नसल्याने निवेदन

नाशिक मिरर वृत्तसेवा :  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ८ मधील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व डांबरीकरण,

काँक्रीटीरण करण्यात यावे, अशी मागणी नाशिक विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.संपूर्ण भारत व विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी रस्त्यांचे सुसूत्रीकरण अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ८ हा मध्यवर्ती ठिकाणी असून शहराच्या विविध भागांना जोडणारे रस्ते याठिकाणी येऊन मिळतात. परिसरात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, धार्मिक स्थळे, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संस्था, मोठमोठी निवासी संकुले तसेच मनपा हद्दीलगत ४२ खेडी असल्यामुळे वाहतुकीचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

रस्त्यांची रुंदी अपुरी असून वाहतुकीच्या दबावामुळे नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागतो. यापूर्वी नाशिक महानगरपालिकेकडे रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी केली असता हे काम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीत या रस्त्यांचा प्रस्ताव सिंहस्थातील कामांमध्ये समाविष्ट नाही, हे निदर्शनास आले आहे.

विशेषतः जेहान सर्कल ते गंगापूर गाव (मनपा हद्दीपर्यंत),महात्मानगर भोसला गेट ते कॅनॉल रोड – सुला वाईन्स रस्ता दोन रस्त्यांवर नागरिकांकडून सतत मागणी होत आहे.

या मार्गावर गेल्या काही वर्षांत शैक्षणिक, व्यापारी व निवासी संकुलांची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पोलीस विभागाकडेही यासंदर्भातील आकडेवारी उपलब्ध आहे.या पार्श्वभूमीवर, शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेविका नयना गांगुर्डे व संतोष गायकवाड यांनी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर करत सदर रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व डांबरीकरण/काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली आहे.

…….

Don`t copy text!