व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचा आरोप; मृतदेहासह नातेवाईकांची कंपनी गेटवर गर्दी, नुकसानभरपाईची मागणी

नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर औद्योगिक परिसरातील नॅश रोबोटिक्स ॲन्ड ॲटोमेशन प्रा. लि. कंपनीत काम करणारे सुरेश भिकाराम सुकेणकर (रा. सातपूर कॉलनी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला; मात्र व्यवस्थापनाने तातडीने मदत न केल्याने ते तब्बल दोन ते तीन तास टेबलवर पडून होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

 

यानंतर सुकेणकर यांना प्रथम ईएसआय हॉस्पिटल व पुढे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच सुकेणकर यांचा मृत्यू झाल्याचा रोष व्यक्त करत त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीच्या गेटवर आणून तीव्र आंदोलन छेडले.

 

यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचीही गर्दी जमली होती. नातेवाईकांसोबत सातपूरमधील सामाजिक कार्यकर्ते नितीन निगळ, लोकेश गवळी, रमेश साळुंखे, परशुराम साठे आदींनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

 

सुकेणकर यांचे बंधू रमेश सुकेणकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने प्राथमिक आश्वासन दिले असून उद्या या प्रकरणी सविस्तर चर्चा होणार आहे.

 

तब्बल एक तास चर्चेनंतर नातेवाईकांनी कंपनी गेटवरून मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या

Don`t copy text!