नाशिक मिरर वृत्तसेवा :

        किरकोळ कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने तरुणावर तुटून पडत धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर श्रमिक नगर परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

मृत तरुणाचे नाव जगदिश परशराम वानखडे वय २३ रा. मूळ गाव सटाणा हल्ली रा. श्रमिकनगर असे असून तो सातपूर येथील एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. मंगळवार रात्री तो मित्रासोबत कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर घरी परतत असताना लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ त्याची दुचाकी थांबवून काही तरुणांनी वाद घातला.

 

प्रणव जगताप याने “गाडी नीट का चालवत नाही” असा प्रश्न विचारत जगदिशवर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रणव जगताप व त्याच्या साथीदारांनी जगदिशवर लाथाबुक्यांसह धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या जगदिशला प्रथम सातपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

या प्रकरणी मृताचा मित्र याने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य उर्फ बाबू यादव, प्रणव जगताप, श्रावण वाघ, साहिल गांगुर्डे, शुभम मगर, अप्पा चोथे, समाधान उर्फ मदनलाल यादव, सुमित यादव, बिट्या आणि ढेगळ्या (पूर्ण नाव उपलब्ध नाही) सर्व राहणार कडेपठार चौक श्रमिकनगर सातपूर येथील असून या दहा जणांविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आरोपींपैकी काही जण सराईत गुन्हेगार असून परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र ठोस कारवाई न झाल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

बातम्या

Don`t copy text!