नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप 

भरवस्तीत झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असताना सातपूर पोलिसांनी आरोपींना चक्क धिंड काढत फिरवले. या कारवाईमुळे परिसरात सुटकेचा श्वास घेतला गेला असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.

श्रमिक नगरातील लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ 23 वर्षीय अशोक वानखडे या निष्पाप तरुणाची काही कारण नसताना टोळक्याने धारदार शस्त्राने निर्दय हत्या केली होती. दहा जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्याने परिसर हादरला होता. रक्ताच्या थारोळ्यात बळी पडलेल्या युवकाच्या मृत्यूनंतर परिसरात प्रचंड चीड व संताप उसळला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे सातपूर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये काही विधी संघर्ष बालकांचाही समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आदित्य उर्फ बाबू वीरेंद्र यादव (18), साहिल गोकुळ गांगुर्डे (20), श्रावण महादू वाघ (18), समीर उर्फ बिट्या कैलाश मेश्राम (22), राहुल मदन सिंह (21, सर्व रा. श्रमिक नगर) यांची सोमवारी (दि.29) सायंकाळी श्रमिक नगर, माळी कॉलनी परिसरात धिंड काढली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहायक निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक राहुल न्ह्याळदे, विलास गिते यांच्यासह पोलिस पथक सहभागी झाले.

नागरिकांनी या धिंडीचे स्वागत करत आरोपींना कडक शासन व्हावे, तसेच भविष्यात अशा गुन्हेगारांना थारा नको अशी आक्रमक मागणी केली.

बातम्या

Don`t copy text!