नाशिक मिरर वृत्तसेवा | मंगेश एरंडे
विशेष प्रतिनिधी
सातपूर मधील प्रभाग क्रमांक १० मध्ये मागील काही काळापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या संदर्भात माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांना निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
प्रभागातील शनी मंदिर, नवजीवन हॉस्पिटल परिसर, श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर परिसर तसेच अशोकनगर या भागात नागरिकांना अत्यल्प दाबाने पाणी मिळत आहे. या परिसरातील पिण्याच्या पाइपलाइन गेल्या २० ते २५ वर्षांपूर्वी बसवण्यात आल्या असून त्या कमी व्यासाच्या आणि जिर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक, विशेषतः महिलांना सणासुदीच्या काळात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मनपा प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत किंवा मनपा निधीतून नव्या व मोठ्या व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन टाकाव्यात, जेणेकरून नागरिकांना पाण्याच्या त्रासातून दिलासा मिळेल. अन्यथा नागरिकांसह मनपाच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, रवि पालवे, शिवाजी देवढे, संदिप मेनकर, वैभव देवरे, कांता मते, शोभा शिंदे, पूजा शिंदे, सुनिता तिडके, भाग्यश्री मोरे, सपना पवार, अंजली गांगुर्डे, रंजना माळी, वर्षा काळे, अनुसया बोडके, स्वाती कदम, भारती देवढे, मिना सोनवणे, मीना पाटील, सुजाता घुले, लता सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
