नाशिक मिरर न्यूज : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत कैद्याचे नाव शिवदास भालेराव (वय ५८, कैदी क्रमांक यूटी-८०२) असे असून तो सिन्नर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
भालेराव याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती आणि जून २०२४ पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेरावने कारागृहातील एका ठिकाणी गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. तातडीने त्याला खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड कारागृहातील काही कैदी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकरणातही ५ ते ६ कैद्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, इतक्या गंभीर घटनांनंतरही कारागृह प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.
📍 सदर प्रकरणाचा तपास नाशिकरोड पोलीस करत असून आत्महत्येचं कारण स्पष्ट होण्यासाठी अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
