पोलिसांची टवाळखोरांशी ‘मैत्रीपूर्ण’ संबंधाची चर्चा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक मिरर वृत्तसेवा: सातपूर परिसरातील बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळ (Satpur Bolkar Valley Police Chowki) मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा तयार झाला असून, या परिसराचा ताबा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ज्या उद्देशाने ही पोलीस चौकी सुरू करण्यात आली, त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. राधाकृष्णनगर, विश्वासनगर, पवार संकुल, श्रमिकनगर, कडेपठार चौक, गंगासागरनगर यांसारख्या भागात गुन्हेगारांच्या टोळ्या व टवाळखोर मुलांचा उपद्रव वाढला असताना, पोलीस चौकीच्या अगदी बाजूलाच हा प्रकार सुरू असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
मनपा जलकुंभ बनला ‘पार्टी स्पॉट’
पोलिस चौकीशेजारी असलेल्या राधाकृष्णनगर मनपा जलकुंभ (Radhakrishnanagar NMC Water Tank) आणि मनपाच्या मोकळ्या भूखंडावर दुपारनंतर आणि अंधार पडल्यानंतर मद्यपी व नशेखोरांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी रोज सायंकाळी दारूच्या पार्ट्या रंगतात. विशेष म्हणजे, टवाळखोर मुलांनी जलकुंभावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांचे गेट तोडले असून, ते सर्रास टाकीवर चढतात. सायंकाळच्या वेळी येथे दारू सोबतच चरस, अफू (Charas, Opium) सारख्या अमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याचे गंभीर चित्र आहे.
पोलीस-टवाळखोरांचे ‘संबंध’ चर्चेत
जवळच मोठी नागरी वसाहत असताना नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोकळ्या मैदानावर असलेल्या खेळण्यांचीही या टवाळखोर मुलांनी मोडतोड केली आहे. या सगळ्या गंभीर प्रकारावर अंकुश का बसत नाही, यावर चर्चा सुरू आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये आणि राधाकृष्णनगर परिसरात अशी चर्चा आहे की, पोलीस चौकीत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या टवाळखोर मुलांसोबत ‘मैत्रीपूर्ण संबंध’ (Friendly relations) प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळेच पोलीस कर्मचारी कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक पोलीस प्रशासन आणि मनपा अधिकारी यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिसरातील मद्यपी व टवाळखोरावर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
राधाकृष्णनगर जलकुंभ व बंद अवस्थेत असलेले स्वाध्याय केंद्र मद्यपी व टवाळखोराचा अड्डा बनला आहे. यामुळे संपूर्ण परिसर असुरक्षित झाला आहे. हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असून कारवाई का केली जात नाही?
संपत आंधळे, स्थानिक रहिवासी

