४५० हून अधिक उपवर-वधूंचा सहभाग
नाशिक मिरर वृत्तसेवा :
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अखिल भारतीय माळी महासंघ, नाशिक जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य वधू-वर परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या माळी समाजाच्या पोटजातींनी एकत्र येत प्रतिसाद दिला. या मेळाव्यात सुमारे ४५० हून अधिक इच्छुक वधू व वर यांनी सहभाग नोंदवून आपल्या जीवनसाथीच्या शोधासाठी व्यासपीठाचा लाभ घेतला.
मेळाव्याचे उद्घाटन अंबादास खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शशी हिरवे तर उपाध्यक्ष म्हणून शंतनु शिंदे उपस्थित होते. महासंघाचे विश्वस्त शिवदास महाजन, अशोक जगझाप, राजाराम काठे, राका माळी, बाजीराव तिडके, रवि हिरवे, शरद मंडलिक, सचिन काठे, नीलिमा सोनवणे, कुसुम शिंदे, संजीवनी गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी माळी समाजातील उपवर-वधूंना एकाच छताखाली एकत्र आणण्याच्या महासंघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. समाजाने काळासोबत बदलून अशा आधुनिक उपक्रमांना पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मनोगतानंतर उपस्थितांचा वधू-वर परिचय करून देण्यात आला, ज्याला उपवर-वधुंकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी माळी महासंघ, नाशिक जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमासे, कार्याध्यक्ष महेश ढोले, कार्याध्यक्ष विकास सोनवणे, नाशिक शहर अध्यक्ष विलास वाघ, महिला जिल्हा अध्यक्ष मंगला जाधव, महिला शहर अध्यक्ष विजया जाधव, उपाध्यक्ष किरणकुमार गीते यांच्यासह महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
