प्रभाग क्रमांक १० मधील विविध विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार!

शिवसेना (उबाठा) आंदोलनाच्या पावित्र्यात

नाशिक मिरर :सातपूर वृत्तसेवा  स्थानिक आमदार निधीतून नाशिक मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मध्ये करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने करण्यात आला आहे.

सिद्धिविनायक नगर येथील मनपाच्या भुमापन ४८५/ १ या भूखंडावर चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश असतानाही केवळ दोन बाजूंनीच भिंत उभी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करून नागरिकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नाशिक महानगर संघटक देवा जाधव यांनी केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेना आंदोलनाच्या तयारीत असून, प्रभाग क्र. १० मध्ये यापूर्वी झालेली इतर कामेसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. शासनाच्या अटी-शर्ती धाब्यावर बसवून केलेल्या कामांमुळे लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत, शिवसेनेकडून लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे देवा जाधव यांनी सांगितले.

 

 

 अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

 प्रभाग क्रमांक १० मधील विकास कामांमधील भ्रष्टाचार बघता, नाशिक पश्चिम मतदारसंघात विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे उघडकिस येत आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी यापूर्वी केलेल्या सर्व कामाची चौकशी करावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडू.

– देवा जाधव, नाशिक महानगर संघटक

 

 

 याबाबत कल्पना नाही. त्या ठिकाणी केलेल्या कामाची सविस्तर माहिती घेते. त्यानंतरच यावर बोलता येईल.

-सीमा हिरे, स्थानिक आमदार

बातम्या

Don`t copy text!