नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर शहरातील कामगारनगर परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. मंगळवार (दि. ४ जून) रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे छोटेलाल भोई यांच्या बंद घराचे कडी-कोयंडे तोडून अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
छोटेलाल भोई हे तिरंगा चौकाजवळील कामगारनगरमध्ये राहतात. दररोजप्रमाणे मंगळवारी सकाळी ते आपल्या भाजीपाला दुकानात गेले होते. दुपारी साडेअकरा वाजता ते काही कामानिमित्त बाहेर गेले असता, त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी असा एकूण अंदाजे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास भोई घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. यानंतर त्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही कामगारनगर व पाईपलाईन रोड परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
