बेळगाव ढगा परिसरात वाढतोय उपद्रव
नाशिक मिरर वृत्तसेवा :
शुल्लक कारणावरून हळदी कार्यक्रमातील वादाचा राग मनात ठेवत टोळक्याने थेट लग्नात धुडगूस घालण्याचा धक्कादायक प्रकार बुधवार, ४ जून रोजी घडला. यामध्ये नवरदेवासह महिलांवर हल्ला करण्यात आला असून, एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या हळदी कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी तो वाद मिटवण्यात आला होता. मात्र, वादाचा राग मनात धरून बुधवारी चार ते पाच जणांच्या टोळक्याने लग्नसमारंभात धुडगूस घालून वाळू संपद आचारी (वय ४५) यांच्या डोक्याला मारहाण केली.
तसेच महिलांना शिवीगाळ करत धाक दाखवण्यात आला. टोळक्याच्या या हल्ल्यामुळे समारंभात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी वाळू संपद आचारी यांच्या तक्रारीवरून एस.बी. आचारी, बाळू निंबेकर, आर.आर. निंबेकर यांच्यासह अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव ढगा परिसरात अशा उपद्रवी टोळक्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अलिकडच्या काळात लूटमारीसारख्या घटनाही घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेळगाव ढगा परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
