उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाच्या भेट म्हणून धर्मवीर विक्रम नागरे यांनी दिला ‘अनोखा अश्व’ भेट
नाशिक मिरर वृत्तसेवा : महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच एक खास आणि अनोखी भेट मिळाली आहे, जी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कायम स्मरणात राहील. शिव कर्मचारी सेनेचे प्रदेश सरचिटणीस विक्रम सुदाम नागरे यांनी, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आणि एकनाथ शिंदे यांचे नातू रुद्रंश यांना एक सुंदर देशी अश्वराज नावाचा अश्व भेट दिला.ही भेट अवघ्या महाराष्ट्र मध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

ही अनोखी भेट देण्यासाठी विक्रम नागरे हे खास दरेगाव येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. रुद्रंश यांना घोड्यांची खूप आवड आहे हे समजल्यानंतर विक्रम नागरे यांनी ही खास भेट देण्याचा निर्णय घेतला. स्वतः प्राणीप्रेमी असलेले विक्रम नागरे यांच्या पिंपळगाव येथील मळ्यात गौशाळा असून तेथे ते अनेक देशी गाय व घोड्यांचे पालन करतात. त्यांनी त्यांच्याकडील सर्वात देखणा आणि हुशार घोडा अश्वराज रुद्रंशसाठी निवडला.
ही भेट पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप आनंद व्यक्त केला. आजवर आपल्याला अनेक भेटवस्तू मिळाल्या, पण ही भेट खऱ्या अर्थाने अनोखी आणि अनमोल असल्याचे सांगत त्यांनी विक्रम नागरे यांचे विशेष कौतुक केले.
या महत्त्वपूर्ण क्षणी विक्रम नागरे यांच्यासोबत उद्योजक शेखर लुनावत, वैभव पुराणिक, शेखर लुणावत, आणि सनी नायक हे देखील उपस्थित होते. या भेटीने शिंदे कुटुंबातील सदस्यांना आणि उपस्थित सर्वांनाच एक अविस्मरणीय आनंद दिला.

