“लिंगसमानतेसाठी भावनांचे व्यवस्थापन आवश्यक – मानसशास्त्र तज्ज्ञ रूबी उनियाल यांचे मत”* 

नाशिक मिरर वृत्तसेवा : देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात लिंगभाव संवेदीकरण समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘लिंगभाव संवेदीकरण’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता, समाजातील लिंगविषयक मानसिकता, महिलांचे सामाजिक स्थान, आणि भावनांचे व्यवस्थापन या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. जयमाला चंद्रात्रे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात लिंगभाव संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “समाजाच्या प्रत्येक घटकाने स्त्री-पुरुष समानतेची खरी जाणीव ठेवून एक समतोल विचार मांडण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांमधून सुरुवात झाल्यास समाजातील सकारात्मक बदल घडवणे शक्य आहे.” त्यांनी महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली.

 

मुख्य वक्त्यांचा परिचय डॉ.दिपिका शिंदे यांनी करुन दिला. 

 

कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक येथील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख श्रीमती रूबी उनियाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, “प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपला ठसा उमटवला असला तरी आजही अनेक महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. स्त्रीला स्वातंत्र्य आहे, मात्र ती खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाली आहे का, हा विचार करण्याची वेळ आहे. लिंगभाव समानता म्हणजे केवळ स्पर्धात्मक बरोबरी नसून, ती आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत तिच्या सक्रीय सहभागाची खात्री असावी.”

 

श्रीमती रूबी उनियाल यांनी भावनिक बुद्धिमत्ता आणि तिच्या व्यवस्थापनावरही भर दिला. “भावनांचे व्यवस्थापन हे मानसशास्त्राचे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. समाजातील बदल मानसिकतेतून सुरू होतो, त्यामुळे मानसिकता परिवर्तनासाठी तरुण पिढीला संवेदनशील करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रोफेसर डॉ. मालती आहे उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “लिंगभाव समानता ही केवळ महिलांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी गरजेची आहे. समाजात अद्यापही लिंगाधारित भेदभाव आढळतो. त्यामुळे या विषयावर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. 

 

यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. डी.के. आहेर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. जयवंत भदाणे, डॉ. एस.डी. ठाकरे, डॉ. विलास वाहुळे, डॉ. सुरवसे, डॉ. संजय बनसोडे, प्रा. चंद्रकांत दाणी, प्रा. अमित बोरसे, प्रा. बादल लाड, प्रबंधक श्री. दिनेश वाघमारे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका हेमलता निकम यांनी केले.

……

बातम्या

Don`t copy text!