अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘घरी बसविण्या’ची मागणी; सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत नागरी प्रश्नांवरून खडाजंगी
नाशिक मिरर वृत्तसेवा : परिसरातील कचरा, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेजची गंभीर समस्या, बंद पथदिवे, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव तसेच धूर फवारणीचा अभाव या मूलभूत नागरी समस्यांवरून सातपूर प्रभाग समितीची बैठक चांगलीच गाजली. नागरिकांच्या प्रश्नांवरून नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. समस्या सोडविता येत नसतील तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, अशा संतप्त शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनाला सुनावले.
सातपूर विभागीय कार्यालयात प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या समस्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर
नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित केला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर प्रभागातील ड्रेनेजची समस्या गंभीर बनली असून अनेक ठिकाणी ड्रेनेजचे घाणपाणी नागरिकांच्या घरांसमोरून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याच ड्रेनेजच्या पाण्यात अंघोळ घालू, अशी संतप्त प्रतिक्रिया इंगोले यांनी बैठकीत व्यक्त केली.
दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त
नगरसेविका सविता काळे यांनी काही भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा मांडला. पिण्याच्या पाण्याचा दर्जा योग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठाही सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
घंटागाडी अनियमित; रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
नगरसेविका मानसी शेवरे यांनी प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. अनेक भागांत घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. यामुळे दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून घंटागाडी नियमित करून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करावी. तसेच आवश्यक त्या भागांत नियमित धूर फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बंद पथदिव्यांमुळे रात्री अंधार
नगरसेवक विश्वास नागरे यांनी प्रभागातील अनेक पथदिवे बंद असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिक महापालिकेला नियमित कर भरतात; त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्री अंधारातून ये-जा करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
पथदिवे बंद असल्यामुळे एखादी दुर्घटना किंवा चोरीची घटना घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्याची वाट पाहू नये. बंद पथदिव्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
झाडांच्या फांद्या-वेलींची छाटणी करण्याची मागणी
नगरसेविका इंदुबाई नागरे यांनीही पथदिव्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. काही भागांत झाडांच्या फांद्या आणि वेली वाढल्यामुळे पथदिवे पूर्णपणे झाकले गेले आहेत. परिणामी रात्री रस्त्यांवर अंधार पसरत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याबरोबरच पथदिव्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व वेलींची छाटणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीत विश्वास नागरे, नितीन निगळ, इंदुबाई नागरे, अंकिता शिंदे, नयना जाधव, मानसी शेवरे, माधुरी बोलकर, सविता काळे यांच्यासह विविध खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
