तीन महिन्यांपूर्वी यांच ठिकाणी मारला होता छापा
नाशिक मिरर वेबटीम :
पंचवटी परिसरातील म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील पुष्कराज अपार्टमेंटमधील तळमजल्यावर असलेल्या घरावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल सहा लाख सत्तर हजाराचा गुटखा जप्त केला. बुधवारी (दि.१६) सकाळी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे व सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसातच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या वाहनातून गुटखा खाली केला जात असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासन विभागास मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी अन्न प्रशासन विभागाने या ठिकाणी सापळा रचला होता. खात्री होताच एफडीएचे अधिकारी संदीप देवरे, अमित रासकर, दाभाडे व स्वतः सहाय्यक आयुक्त परळीकर यांनी पाळत ठेवून सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान हा छापा टाकला. याप्रकरणी मोराडे याच्या विरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दुसऱ्यांदा छापा टाकण्यात आल्याने शहरात गुटखा माफियांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुटख्याच्या सेवनाने युवा पिढी बरबाद होत असल्याने शासनाने करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडून राज्यात गुटखा बंदी केली आहे. असे असतानाही काळ्या बाजारात मात्र मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची गुटख्याची उलाढाल होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
