नाशिक मिरर वेबटीम : एसटी महामंडळाची बसचालक जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या चालकास मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील सजन शिंदे (३९, रा. संजय नगर, पंचवटी) हे एस टी महामंडळाच्या बसने (क्र. एमएच ४० एन ९८३२) मुंबई-आग्रा महामार्गावरुन प्रवासी घेऊन चालले होते. अमृतधाम चौफुलीजवळील असताना यावेळी अचानक चौघा संशयितांनी बसला दुचाकी आडवी लावली व बस थांबवून शिंदे यांना कुरापत काढून शिवीगाळ सुरु केली. त्यांना बसमधून बाहेर ओढून मारहाण सुरु केली. पुन्हा या रोडवर दिसला तर जीवे मारू अशी धमकीही दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी घटनास्थळी भेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सुनील सजन शिंदे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात नवनीत मिथिलेश पटेल (२२) सचिन ज्ञानेश्वर निकम (दोघे रा. शिवकृपानगर, हिरावाडी), अंगत दत्तात्रय देवरे (२०, अयोध्यानगरी, साईनगर), वैभव राजेंद्र कर्डक (२९ साईनगर, अमृतधाम) या संशयितांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. गिरी हे पुढील तपास करीत आहे.
