मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 6 : मराठी पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले आहे. तसेच पत्रकार बांधवांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. सामान्य माणसाला आवाज देणाऱ्या प्रबोधनकारांच्या तसेच बाळासाहेबांच्या पत्रकारितेचा वारसा देखील आपल्याकडे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा धगधगता वसा मराठी पत्रकारितेला मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
मराठी पत्रकार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून, मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
