मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश
नाशिक मिरर वेबटीम : बऱ्याच दिवसांपासून राज्यात व जिल्हयात चर्चेचा विषय ठरलेला माजी आमदार वसंत गिते, भाजपा नेते सुनील बागूल हे शिवसेना मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चे ला पूर्ण विराम मिळालेला असून अखेर आज मातोश्रीवर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्ये प्रवेश करणार आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून, आज दि. ८ रोजी सायं.५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिसळ पार्टीतून राजकीय धुराळा उडवून देणारे भाजपचे नेते व माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागूल भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असून दोन्ही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे नाशकात रंगली होती. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे य गुरुवारी (दि. ७) नाशिकच्या दौऱ्यावर आले होते.त्यांच्या या दौऱ्यात गिते, बागूल यांच्या प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा झाली.महापालिका निवडणुकांना वर्षभरानंतर होणार असल्या तरी शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये घरवापसी केली. त्यामुळे शिवसेनेकडूनही भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व माजी प्रदेश उपाध्यक्ष असलेले गिते आणि बागूल हे सध्या भाजपमध्ये विजनवासात होते. गेल्या कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे गिते हे भाजपमध्ये नाराज होते.
वसंत गिते यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिसळ पार्टी आयोजित करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पार्टीत जमलेल्या सर्वपक्षीय शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत गितेंनी मात्र भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत कोणतेही भाष्य न करता गूढ कायम ठेवले होते. परंतु, गिते आणि बागूल एकत्रितरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले होते.
