म्हसरूळ गुन्हे शोध पथकाची कारवाई ;एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक मिरर वेबटीम :
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघा संशयितांकडून गावठी कट्टयासह पाच जिवंत काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार शेवरे, गणेश रेहरे, पोलीस शिपाई चव्हाण, गुंबाडे, राठोड हे शनिवारी (दि.३०) सकाळी पेठरोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना पेठ रोडवर संशयास्पद कार (क्र. एम एच ०४ ए डब्लू १२८८) आढळली. त्यावरून सापळा रचून त्यांनी संशयित मयूर रवींद्र ढवळे, (२४, रा. सप्तरंग सोसायटी, पेठरोड) व आशिष सुनिलदत्त महिरे (२४, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती व कारची तपासणी केली असता या संशयितांकडे एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, एक लाकडी दांडका आदी साहित्य आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
