नाशिक मिरर वेबटीम : सिन्नर तालुक्यात शिर्डी मार्गावरील पांगरी-पंचाळे रस्त्यालगत 50 ते 60 फूट खोल विहीरीत शनिवारी (दि.30) सकाळी 10.30 च्या सुमारास स्विफ्ट कार व चालकाचा सापळा आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. अंदाजे सहा ते सात महिन्यांपूर्वी ही कार विहिरीत पडलेली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दुलाजी थोरात यांच्या पेट्रोल पंपापासून जवळच सुधाकर बेदरकर यांची विहीर असून या शेतकर्‍याने शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विहीरीतील पाणी उपसले. तेव्हा कार आढळून आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस हवालदार गोरक्षनाथ बलक व गौरव सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

क्रेनच्या सहाय्याने कार विहीरीबाहेर काढली असता त्यात चालकाचा मृतदेह आढळून आला. पाण्यात मृतदेह कुजल्याने केवळ सापळा शिल्लक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, कारमध्ये मिळालेल्या ड्रायव्हिंग लायसनवरुन पोलिसांनी कारचे मूळ मालक दिनेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला. ते उत्तर प्रदेशात राहतात. पुण्यात त्यांचा मुलगा जॉबला आहे. त्याने एका ड्रायव्हरमार्फत सहा-सात महिन्यांपूर्वी कार इंदोरला पाठविली. मात्र ती तिकडे पोहचली नसल्याने पुणे येथे कारसह चालक बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन टायर फुटल्याने अपघात होऊन कार विहीरीत कोसळली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.चालकाची खिशातील आधार, पॅन व मतदार ओळख पत्रावरुन ओळख पटली आहे. संजय तुळशीराम आहिरे असे मृताचे नाव असून तो मूळचा रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक येथील रहिवाशी आहे. पुणे येथे कुटूंबासह राहून बदली चालक म्हणून खासगी गाड्यांवर काम करत होता. या घटनेची नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून ते पोहचल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!