नाशिक मिरर वेबटीम : श्रमिकनगर येथील नगरसेवकांच्या कार्यालयाजवळ उभी केलेल्या टेम्पो वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोड-फोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत टेम्पो मालकाने सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
श्रमिकनगर येथे नगरसेविका हेमलता कांडेकर यांचे संपर्क कार्यालय आहे.कार्यालयाजवळच शाम शेलार राहतात.शेलार यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक एम.एच.१५ डी.के. ६७९२ त्यांनी घराजवळ उभा केलेला असतांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टेम्पोची पुढील काच फोडून पोबारा केला.सकाळी शेलार यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी सातपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.त्याच प्रमाणे टेम्पोच्या शेजारी लावलेल्या रिक्षमधून टेप सुद्धा चोरीला गेल्याचे रिक्षा मालकाच्या लक्षात आले.परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे रहीवाश्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी देखील हिंदी शाळेजवळ अज्ञात समाजकंटकांनी घरांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडलेला आहे.याबाबत त्यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.आणि श्रमिकनगर भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी केली आहे.
