नाशिक मिरर वेबटीम :
विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयुक्त गमे यांनी लस टोचून घेतली होती.
शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. राज्यात बहुतांश सर्वच ठिकाणी रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने राज्य शासनाने काही नियम व निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा प्रशासन तसेच मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांनी नियमावली जाहीर करत सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ व उत्सवांवर निर्बंध लादले आहेत. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गमे यांनी तीन दिवसांपूर्वीच सर्वच जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षकांना सूचना करत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले हाेते. तसेच दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन लस घेतली हाेती. त्यानंतर लगेचच ते पॉझिटिव्ह आढळून आले.
गमे यांच्या पाठोपाठ झाकिर हुसेन रुग्णालय कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. रावते १७ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आले असून, त्यांचे लसीकरण १ फेब्रुवारीला झाले होते. डॉ. रावते हे होम आयसोलेशन आहेत. गेल्या ११ महिन्यांपासून ते झाकिर हुसेन रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
