मनसेचा खासगी रुग्णालयांना इशारा 
नाशिक मिरर : 
          एकीकडे कोरोना या महामारीचा उद्रेक सुरू असताना, दुसरीकडे मात्र त्याचे भांडवल करत शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली करत काही खासगी रुग्णालय टाळू वरचे लोणी खात असल्याचा धक्का दायकप्रकार सातपूर सह नाशिक शहर परिसरात समोर येत आहे. मनपा व पोलिस प्रशासनाने वेळीच याची दखल घेत परिसरातील रुग्णालय प्रशासन, लोकप्रतिनिधी व कोविड बाधित रुग्णांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करत मार्ग काढावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेचे नगरसेवक सलीम शेख व योगेश शेवरे यांनी निवेदनाद्वारे सातपूर चे  वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना दिला आहे.
       नाशिक शहरात कोरोना रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहे. यास सातपूर शहर अपवाद नाही. छोटी वस्ती असलेल्या सातपूर विभागात नागरिकांची घरे छोटी व कुटुंब संख्या मोठी आहेत. कुटुंबातील एखादी व्यक्ती पॉझिटिव आल्यास घरातच विलगीकरण (क्वारंटाइन ) होणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. सध्याची परिस्थिती बघता खासगी रुग्णालय नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहे.
      अनेक खासगी रुग्णालय नागरिकांना अव्वाच्या सव्वा देयके देत नागरिकांची थेट लूट करत असल्याचे समोर येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे कुठेहि पालन होताना दिसून येत नाही. कुठल्याही प्रकारे अनामत रक्कम न घेण्याचे आदेश असताना, अनामात रक्कम शिवाय रुग्णांना दाखल करून घेत जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. खासगी रुग्णालयांच्या या अशा धोरणामुळे सर्वसामान्य जनता भिकेला लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वेळीच कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने परिसरातील रुग्णालय प्रशासन, लोकप्रतिनिधी व कोविड बाधित रुग्णांच्या प्रतिनिधीची तातडीने बैठक आयोजित करत मार्ग काढावा. यावर निर्णय न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांना मनसेचे नगरसेवक सलीम शेख योगेश शेवरे यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे विभाग प्रमुख बंटी लबडे, वैभव महिरे आदी उपस्थित होते.
वेळ पडल्यास तोंडाला काळे फासू
या जागतिक महामारीत अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टर देव दुता प्रमाणे काम करत आहे. त्याचे आभार मानावे तितके थोडे आहे. तर काही खासगी डॉक्टर संधी फायदा घेत रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. या निवेदनाद्वारे हा प्राथमिक इशारा असून नागरिकांची लूट न थांबल्यास त्या डॉक्टरांच्या चेहऱ्याला काळे फासू.
– सलीम शेख,
स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक

बातम्या

Don`t copy text!