नाशिक मिरर :
नाशिक येथील नाशिक मनपाचे झाकीर हुसेन रुग्णालय ऑक्सिजन गळती दुर्घटनेत व्हेंटिलेटरवर २३ पैकी २२ रुग्ण दगावले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. टॅकरमधून टाकीत ऑक्सिजन भरले जात असताना तांत्रिक दोष निर्माण होऊन सदर ऑक्सिजन गॅस गळती झाली असल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली. सदर खासगी कंपनीची टाकी असून तांत्रिक दोष दूर करण्यात आला आहे.सदर घटनेबाबत शासनास सर्व माहिती देण्यात आली असून पुढील आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.दरम्यान, आजूबाजूच्या रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील सिलेंडर आणून ऑक्सिजन पुरवठा सध्या सुरळीत केला आहे. ऑक्सिजन टँकर येण्यापूर्वीच टाकीमधून गळती सुरु झाली होती. टँकरसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी टाकीचे कुलुप तोडून गळती थांबवली. निखिल ऑक्सिजन कंपनीच्या तंत्रज्ञाची या कामी मदत मिळाली, म्हणून २५ टक्के ऑक्सिजन वाचविता आला अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
राज्य शासनाने मृत रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.नाशिक महापालिकेने देखील कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत घोषित केली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली. एकूण २२ रुग्ण मृत झाले. असून ११ पुरुष आणि ११ महिला आहेत.
ऑक्सिजन टाकीच्या लिकेजमूळे २२ कोरोना बाधित रुग्णांना प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर मयत रुग्णाचे नातेवाईकानी हॉस्पिटलच्या आवारात एकच गर्दी करीत आक्रोश केला. नातेवाईकच्या या आक्रोशाने उपस्थिताचे मन हेलावले.
ऑक्सिजन टाकी लिकेजची घटना घडल्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या मदतीने आपल्या रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्यात यश आले नाही. या घटनेत कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाउ तर काही कुटुंबानी तरुण मुलगा गमावला आहे. एकूणच या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात नातेवाईकनी संताप व्यक्त करतानाच घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दोषींवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
