ईएसआयसी रुग्णालयात लवकरच कोविड सेंटर

नाशिक मिरर :  शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करुन संयम राखल्यास करोनाचे संकट दुर होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

 

“आम्ही सातपूरकर ” या मित्र समुहाच्या वतीने सातपूरला “रेशीमगाठी मंगल कार्यालय “ येथे ७० बेडचे आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. त्या सेंटरचे उदघाट्न आज सोमवारी सायंकाळी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जाधव म्हणाले कि, नि:स्वार्थीपणे चांगले कार्य करायचे ठरले, तर शेकडो हात मदतीसाठी पुढे येतात. याचे प्रत्यय आज सातपूर भागात बघायला मिळाले. या सेंटरला मनपाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जाधव म्हणाले.तसेच दोन दिवसात सातपूर ईएसआय हॉस्पिटल येथे मनपाच्या वतीने कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या सेंटरमुळे सातपूरकरांची परवड कमी होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे जाधव म्हणाले.
सातपूर कोविड सेंटरच्या माध्यमातुन सातपूर परिसरातील विविध समाज मंदिरानाही मदत मिळणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर्स, सिस्टर, ब्रदर पुरविले जाणार असून समाज मंदिर चालकांनी केवळ आपली सेंटर सुरू करण्याची इच्छा दर्शवावी.असे ही जाधव यावेेळी म्हणाले.

 

सातपूर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी अनेक दानशूर धावून आले.राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक,कला,वाणिज्य,व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती कडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कोणी रोख स्वरूपात तर कोणी वस्तुच्या स्वरुपात,तर कोणी जबाबदारीच्या स्वरूपात सेंटरला मदत करत आहे. नगरसेवक,विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ‘आम्ही सातपूरकर , या संकल्पना वर आधारित  सुरू करण्यात आलेले कोविड विलगिकरण सेंटरची सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

बातम्या

Don`t copy text!