नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार मध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकखाली रस्त्यालगत बसलेल्या मोकाट गायींचा कळप चिरडला गेल्याची दुर्दैवी व काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. यामुळे दोन गर्भवती गायी जागीच मरण पावल्या. विदारक घटना विसरवाडी गावातून जाणाऱ्या धुळे-सुरत महामार्गावर घडली.
अधिक माहिती अशी की, धुळे सुरत महामार्गावर नवापुर तालुक्यातील विसरवाडी गावात नेहमीप्रमाणे भटक्या मोकाट गायींचा कळप महामार्गालगत बसलेला होता. भरधाव वेगात जाणारा एक ट्रक अक्षरशः त्यांना तुडवत पुढे धावला. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एकाच वेळी अनेक गाईंचा काळीज चिरणारा हंबरडा ऐकून रस्त्यालगतच्या झोपड्यांमधील व घरांमधील लोक धावून आले. तेव्हा त्यांना रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसला. तीन गाईंची मान चिरली गेली होती तर अन्य दोन-तीन गाईंचे पाय चेचले गेले होते. ही घटना कळताच सुरेश टीमल्या, किरण सामुद्रे, सचिन जाधव, खाटीक व अन्य गोसेवकांनी धाव घेऊन तातडीने मदत कार्य सुरू केले. विसरवाडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस देखील घटनास्थळी धावून आले. जखमी गायींवर पशुवैद्यकीय अधिकारी बोलवून उपचार करण्यात आले. धक्कादायक असे की, दोन्ही मृत गाई गर्भवती आढळून आल्या. तीन वासरे आणि दोन गाई जखमी असल्याची माहिती विसरवाडी पोलिसांनी दिली. हा अपघात घडवणारा ट्रक चालक मात्र ट्रक सह लगेचच फरार झाला. त्या अज्ञात वाहन चालका विरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
