नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार जिल्ह्या मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्यांना मारून नंतर त्यांचे पंजे तोडले तसेच मिशा,नखेही उपटले; असा भयानक प्रकार केल्याचे आढळून आले आहे. नवापुर तालुक्यातील गडदाणी जंगलात हा अघोरी प्रकार घडल्याचे उगडकीस आले आहे.एकीकडे बिबट्या च्या दहशती मुळे नागरिक सैरभैर झाले असतांना, दुसरीकडे समाजकंटक प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तस्करांनी बिबट्या चेच लचके तोडण्यास सुरूवात केली आहे.वनविभागाचे पथक अधिक शोधासाठी कार्यरत झाले असून, आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही पाळीव प्राण्यांवर त्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. शनिवार दिनांक १९ डिसेंबर रोजी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गडदाणी जंगलात बिबट्या वाघाला मारून जमिनीत पुरले असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. ही माहिती मिळताच चिंचपाडा वनविभागाचे वनअधिकारी आर.बी. पवार, उपवनसंरक्षक कवठे, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार हे विसरवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह जंगलातील त्या ठिकाणी पोहोचले. एक खोल खड्डा करून त्यात मेलेला बिबट्या गाडलेला त्यांना आढळून आला. कुजलेल्या अवस्थे वरून त्याला मारून काही दिवस उलटल्याचे स्पष्ट झाले. नख, मिशा, पंजे दिसले नाही. त्यांनी लगेचच तपास चक्र फिरवले. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अधिक तपास करून रविवारी आणखी चार जणांना ताब्यात घेतले. तेव्हा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पशूला लाजवेल इतका भयानक प्रकार माणसांनी केल्याचे त्यांना पाहायला मिळाले. आणखी एक बिबट्या मारून गडदाणी जंगलात जमिनीत गाडल्याची माहिती त्या संशयितांनी दिली. या अधिकाऱ्यांनी आज सोमवार दिनांक 21 रोजी पुन्हा जंगल परिसरात खोदून पाहिले असता दुसरा बिबट्या जमिनीखाली पुरलेल्या व कुजलेल्या अवस्थेत मिळाला. त्याचेही चारही पंजे नखे आणि मिशा काढण्यात आल्या होत्या. बिबट्याचे अवयव काढून विकण्यासाठी हा अघोरी प्रकार केला असावा काय? याची खात्री करणारे पुरावे आता वनखात्याचे पथक मिळवत आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली तसेच विसरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून दोन्ही बिबट्यांवर अंतिम संस्कार देखील करण्यात आले.

