नाशिक मिरर वृत्तसेवा : 

सातपूरमधील खंडणी प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, ज्येष्ठ नागरिक फिर्यादीच मोठ्या सेक्स स्कँडलमध्ये अडकला आहे. खंडणीखोरांविरोधात तक्रार करणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीविरोधातच एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषण, आयटी अॅक्ट  तसेच ॲट्रॉसिटी  कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

२ एप्रिल रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल खंडणी प्रकरणात आधीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. त्यांची तपासणी करताना तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्याने पोलिसही चक्रावले. या सर्व व्हिडिओंमध्ये खंडणी प्रकरणातील फिर्यादी विविध महिलांसोबत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा एका पीडित महिलेने सातपूर पोलिसांशी संपर्क साधत गंभीर आरोप केले. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित रविंद्र गणपत एरंडे (वय ६३, रा. सातपूर,व्य.सा. सन्मान युग संपादक) याने “तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचे भविष्य उज्ज्वल करतो” असे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. तसेच ती अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनही त्याचा गैरफायदा घेत, नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी रविंद्र एरंडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७७, आयटी अॅक्ट कलम ६७(अ) तसेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मोठ्या सेक्स स्कँडलची उकल?

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी एरंडे याने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हिडिओ शूट केल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून मोठे सेक्स रॅकेट किंवा स्कँडल उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 पोलिसांचे आवाहन व संपर्क क्रमांक

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरोपीविरोधात कोणतीही तक्रार असल्यास ती सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवावी. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

📞 संपर्क क्रमांक:

सचिन बारी (सहा पोलीस आयुक्त, अंबड विभाग): 9049872822

प्रकाश अहिरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर): 9823234176

स्वप्नाली पलांडे (पोलीस निरीक्षक): 7774002710

 तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, खंडणी प्रकरणातून उघड झालेल्या या नव्या गुन्ह्यामुळे सातपूरसह संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, “फिर्यादीच आरोपी” ठरल्याने पोलिसांच्या तपासाच्या दिशेबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या

Don`t copy text!