नाशिक मिरर वृत्तसेवा :

 ज्योतिषी व वास्तू दोष निवारण करणार्‍या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून त्यातील अश्लील डेटा मिळवत,सातपूर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश केला. पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत चार आरोपींना अटक केली असली, तरी या प्रकरणात फिर्यादीकडे मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य सापडल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी एका ज्येष्ठ नागरिकाने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपींनी त्यांच्या कार्यालयातील टॅब चोरी करून त्यामधील वैयक्तिक स्वरूपाचे जुने न्यूड फोटो व व्हिडिओ हस्तगत केले. या संवेदनशील माहितीच्या आधारे आरोपींनी फिर्यादीला धमकावत १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच दबाव वाढवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला १० हजार रुपये उकळले आणि त्यानंतर संबंधित अश्लील फोटो व व्हिडिओ फिर्यादीलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून भीतीचे वातावरण निर्माण केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त किशोर काळे आणि सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस व गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ अशी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, तसेच स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी आडगाव शिवारातील ‘१०वा मैल’ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत त्यांचा पाठलाग केला आणि काही वेळातच त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश पुंडलिक बकरे (वय २८), प्रकाश रामदास पानपाटील (वय २५), सूरज सुनिल गवई (वय २७) आणि श्रीपत भिमराव शिंदे (वय ३८) यांचा समावेश आहे. चौघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

पोलिसांच्या भूमिकेवर संशय का?

या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक गंभीर बाब समोर आली आहे. फिर्यादीच्या टॅबमध्ये मोठ्या प्रमाणात – सुमारे दीडशे ते दोनशे – अश्लील फोटो व व्हिडिओ साठवलेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे फिर्यादीची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.फिर्यादीचे व तक्रारदाराची ओळख का लपवली जात आहे.फिर्यादीने या प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी नाशिक च्या आमदार व संगमनेर मधील बड्या नेत्यांना देखील फोन केल्याची माहिती मिळत आहे.

या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पोलिसांनी स्पष्ट केले की, “सदर व्हिडिओमधील संबंधित महिलांनी तक्रार केल्याशिवाय फिर्यादीवर गुन्हा दाखल करता येणार नाही.” तसेच “अश्लील व्हिडिओ बाळगणे हा गुन्हा नसून, तो व्हायरल करणे हा गुन्हा आहे,” असा कायदेशीर मुद्दा पोलिसांनी मांडला.

मात्र, या स्पष्टीकरणामुळे पोलिस फिर्यादीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

 

 पुढील तपास सुरू; आणखी धागेदोरे शोधात

सदर गुन्ह्याचा तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करीत असून, या टोळीचा इतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!