नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याची एन्ट्री नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले.प्रभाग क्रमांक ९ मधील ध्रुव नगर संत तुकाराम महाराज गार्डन परिसरात अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील कामगारांना एका खोलीत शांतपणे बसलेला बिबट्या दिसून आला आणि ही माहिती क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रहिवासी भागात बिबट्या शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती, त्यामुळे बचावकार्य अधिकच आव्हानात्मक बनले.
गार्डन परिसरात दाट झाडाझुडपे आणि अडथळ्यांमुळे बिबट्याचा माग काढणे अवघड ठरत होते. त्यामुळे प्रशासनाने अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये बिबट्या झुडपांमध्येच लपून बसल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
यानंतर जेसीबीच्या सहाय्याने झुडपे हटवून परिसर मोकळा करण्याची रणनीती राबविण्यात आली. मात्र या हालचालीदरम्यान बिबट्याने अचानक जागा बदलत श्री स्वामी रो बंगलो परिसरात धाव घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा होत असल्याने वन विभागाच्या पथकाला अडथळे येत होते. तरीही संयम राखत आणि योग्य नियोजन करत अखेर वन विभागाने डार्ट गनचा वापर करून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
या संपूर्ण थरारक कारवाईदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी दिनकर पाटील आणि अमोल पाटील घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी टळली असली तरी या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये जंगल क्षेत्र कमी होत असल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सातपूरमधील ही घटना केवळ एक अपघाती प्रसंग नसून शहर आणि वन्यजीव यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
