सातपूरमध्ये शोककळा; अवजड वाहनांवर नियंत्रणाची नागरिकांची जोरदार मागणी
नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथे बुधवारी (दि. १५) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात नववीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास जेबीएम कंपनी रस्त्यावर हा अपघात झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात चेतन युवराज गांगुर्डे (वय १६, रा. दादासाहेब गायकवाड चौक, प्रबुद्ध नगर, सातपूर) याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन हा परीक्षेसाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या एमएच १५ जे डब्ल्यू २०२४ क्रमांकाच्या खाजगी बसने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चेतनचा जागीच मृत्यू झाला.
चेतन हा अत्यंत होतकरू व कष्टाळू विद्यार्थी होता. तो केटरिंगचे काम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत होता. त्याचे वडील अंध असून कुटुंबात एक भाऊ आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या चेतनच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, जेबीएम कंपनी रस्ता हा अवजड वाहनांच्या मोठ्या वर्दळीचा असून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यापूर्वीही अशा घटनांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
