पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक; काही अंतर दुचाकी फरफटत नेल्याचा आरोप
सातपूर :नाशिक मिरर वृत्तसेवा
त्र्यंबक रोडवर बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या २६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून, त्यांच्या हात-पायांना दुखापत झाली आहे. हा अपघात बुधवारी (२ सप्टेंबर) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पपया नर्सरीजवळ कुबेर पेट्रोलपंपासमोर घडला.
प्रतीक्षा राजकुमार आवारी (वय २६, रा. कोपुर्ली बुद्रुक, ता. पेठ, जि. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती शामवेल काशीराम इंपाळ (वय ३२) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामवेल इंपाळ हे पत्नी प्रतीक्षा यांच्यासह रक्षाबंधनानिमित्त नाशिक येथे आले होते. सण साजरा केल्यानंतर बुधवारी सकाळी दोघेही एमएच १५ जीजी १८९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले होते.
त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीजवळ कुबेर पेट्रोलपंपासमोरून त्यांची दुचाकी जात असताना पाठीमागून आलेल्या एमएच १५ एचएन ६०७१ क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीच्या मागील बाजूस बसलेल्या प्रतीक्षा या बसच्या मागील चाकाजवळ गेल्याने त्यांच्या डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात प्रतीक्षा यांचे पती शामवेल इंपाळ यांनाही हात-पायांना दुखापत झाली असून, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताची नेमकी कारणे तसेच घटनेबाबत अधिक तपशीलाचा तपास सातपूर पोलिसांकडून सुरू आहे.
रक्षाबंधनाचा सण साजरा करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातल्याने प्रतीक्षा यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
