कुटुंबीयांनी दाखविले प्रसंगावधान; पहाटे चार वाजता वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट्याला केले जेरबंद
पेठ : नाशिक मिरर वृत्तसेवा तालुक्यातील हरणगाव येथे मंगळवारी (दि. १) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने गावात एकच खळबळ उडाली. सुभाष रघुनाथ भरसट यांच्या मळ्यातील राहत्या घरात बिबट्या शिरल्याचे निदर्शनास येताच भरसट कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला. त्यांनी घराचे दरवाजे सुरक्षितरीत्या बंद करून कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी ठेवले आणि तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच ननाशी (प्रा.) वनपरिक्षेत्रातील महाजे राऊंडचे वनकर्मचारी तसेच नाशिक येथील रेस्क्यू पथक तातडीने हरणगावकडे रवाना झाले. मध्यरात्रीपासून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. घरामध्ये बिबट्या असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने काळजीपूर्वक कारवाई करत पहाटे सुमारे चार वाजता बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले.
रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन
वनविभागाच्या पथकाने परिस्थितीचा अंदाज घेत नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू मोहीम राबविली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वनपरिमंडळ अधिकारी महाजे बी. डी. सूर्यवंशी, वनरक्षक श्रीमती डी. के. पठाण, कृष्णा गांगुर्डे, किरण दळवी तसेच नाशिक रेस्क्यू टीमचे अभिजित माहले, डॉ. हेमराज आणि त्यांच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
अखेर पहाटे चारच्या सुमारास रेस्क्यू पथकाला बिबट्याला ताब्यात घेण्यात यश आले. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर भरसट कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
रेस्क्यू कारवाईदरम्यान हरणगावचे पोलीस पाटील निवृत्ती पवार, संजय भरसट, शिवाजी जाधव, ओमकार पवार, किरण जाधव, भास्कर जाधव, जयप्रकाश वाघ, प्रकाश राऊत यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
भरसट कुटुंबीयांनी घाबरून बाहेर धावण्याऐवजी घर सुरक्षितपणे बंद करून वनविभागाला माहिती दिल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य जीवितहानी टळल्याचे मानले जात आहे.
‘बिबट्या घरात येतोय, आता वनविभाग जागा होणार का?’
पेठ तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही काळापासून बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. शेतमळ्यांमध्ये काम करणारे शेतकरी, महिला, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे.
आता तर बिबट्याने थेट नागरिकांच्या घरात प्रवेश केल्याने वनविभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या गावांमध्ये नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅप, आवश्यक ठिकाणी पिंजरे आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
‘धोका निर्माण होण्यापूर्वी उपाययोजना करा’
एखादी घटना घडल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेण्यापेक्षा वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
हरणगावचे पोलीस पाटील निवृत्ती पवार आणि सरपंच पल्लवी भरसट यांनी वन्यप्राण्यांपासून नागरिकांना असलेला धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
बिबट्या पहाटे सुरक्षितपणे जेरबंद झाल्याने भरसट कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या घटनेनंतर परिसरात एकच प्रश्न चर्चेत आहे—“आज बिबट्या घरात शिरला; उद्या कोणाच्या जीवावर बेतणार?”
पेठ तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे आता वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.
