सातपूरमधील निलय कंपनी परिसरातील घटना; १२ वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले
सातपूर : नाशिक मिरर वृत्तसेवा सातपूर परिसरातील निलय कंपनी येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावरील खड्डा आणि चिखलामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १) सकाळी सुमारे ११ वाजता घडली. सुजित राजेंद्र गायकवाड (वय ४३, रा. राहुल नगर, पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित गायकवाड हे दुचाकीवरून निलय कंपनीच्या दिशेने जात होते. हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर खड्डा आणि चिखल असल्याने तो चुकविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गायकवाड यांच्या दुचाकीची चारचाकी वाहनाला धडक झाली आणि ते रस्त्यावर कोसळले.
याचवेळी समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या पुढील चाकाखाली ते आल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि चिखलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खड्ड्यांमुळे शहरात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलने व मोर्चे काढण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सुजित गायकवाड यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि अवघी १२ वर्षांची मुलगी आहे. एका अपघातामुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि चिखलामुळे आणखी किती बळी जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेनंतर तरी प्रशासनाने रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत तसेच चिखलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
