नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मात्र या विकासकामांसाठी सुरू असलेले खोदकाम, उखडलेले रस्ते आणि त्यातून निर्माण झालेले जीवघेणे खड्डे आता नागरिकांच्या जिवावर उठू लागले आहेत. अंबड लिंक रोडवरील खड्ड्याने एका कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला असून, सुनील दादाजी बोरसे (वय ५२) यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

सातपूर परिसरातील अशोकनगर, बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे राहणारे सुनील बोरसे हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सकाळच्या सुमारास ते दुचाकीवरून रंगकामाच्या कामासाठी जात असताना अंबड लिंक रोडवर हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.

 

खड्ड्यात दुचाकी आदळली अन् काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले!

 

अंबड लिंक रोडवरील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे दुचाकीच्या पाठीमागे बसलेले सुनील बोरसे खाली फेकले गेले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाच्या चाकाखाली ते सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह; आता कुटुंबाचा आधारच गेला

 

सुनील बोरसे हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, विधवा आई आणि विधवा बहीण असा परिवार आहे. कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा मोठा भार त्यांच्या खांद्यावर होता.

 

त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आर्थिक आणि भावनिक आधारच हिरावला गेला आहे. विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदले जात असताना या निष्पाप नागरिकाच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

खड्डे की मृत्यूचे सापळे?

 

अंबड लिंक रोडवरील खड्डे दिवसेंदिवस अपघातांना आमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकीस्वार, कामगार, विद्यार्थी आणि नागरिक प्रवास करतात.

 

खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचा तोल जाणे, वाहने घसरणे आणि अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र आता खड्ड्यामुळे थेट एका नागरिकाला जीव गमवावा लागल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

 

कुंभमेळ्याची कामे हवेत, पण नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय?

 

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही. मात्र कामे सुरू असताना नागरिकांच्या जीविताची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणांचीच आहे.

 

रस्त्यावर खोदकाम सुरू असल्यास योग्य बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना आणि सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे आवश्यक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्डे स्पष्टपणे दिसतील, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

 

एक मृत्यू… आणि प्रशासनासाठी अनेक प्रश्न!

 

सुनील बोरसे यांचा मृत्यू केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. रस्त्यावरील खड्डे, सुरू असलेली विकासकामे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन यांचा नागरिकांच्या जीवाशी थेट संबंध आहे.

 

आता प्रशासन संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवणार का? सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करणार का? आणि सुनील बोरसे यांच्या मृत्यूनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का?

 

या दुर्घटनेनंतर अंबड लिंक रोडवरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांचा जीव त्याहून महत्त्वाचा आहे, अशी संतप्त भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Don`t copy text!