देशातील ८७२ उमेदवारांमधून अंतिम २२ जणांमध्ये निवड; डीजी एनसीसी यांच्या हस्ते दिल्लीत सन्मान
नाशिक मिरर वृत्तसेवा :देवळा
देवळा तालुका, नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या उल्लेखनीय कामगिरीत कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा येथील भूगोल विभागप्रमुख व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी लेफ्टनंट डॉ. बादल संभाजी लाड यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘NCC Achievers Award–2026’ प्रदान करण्यात आला आहे. देशभरातील माजी एनसीसी कॅडेट्सच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारासाठी यंदा ८७२ अर्जांमधून अंतिम २२ जणांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून लेफ्टनंट डॉ. लाड यांची निवड झाल्याने देवळ्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव झाला आहे.
राष्ट्रीय छात्र सेना स्थापनेनिमित्त १५ जुलै २०२६ रोजी प्रताप हॉल, डीजी एनसीसी कॅम्प, दिल्ली कॅन्ट, नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डायरेक्टर जनरल एनसीसी लेफ्टनंट जनरल विरेंद्र वत्स (YSM, SM, VSM) यांच्या हस्ते लेफ्टनंट डॉ. लाड यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे माजी एनसीसी कॅडेट्स, वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
एनसीसी अल्युमनी क्लब, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘NCC Achievers Award’ हा पुरस्कार राष्ट्रनिर्मिती, नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी, शिक्षण, संरक्षण, प्रशासन, उद्योग, सामाजिक सेवा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माजी एनसीसी कॅडेट्सना प्रदान केला जातो. यंदा देशभरातून प्राप्त झालेल्या ८७२ अर्जांची कठोर छाननी करून विविध निकषांच्या आधारे अंतिम २२ जणांची निवड करण्यात आली.
लेफ्टनंट डॉ. बादल लाड यांनी अनेक वर्षांपासून एनसीसीच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम, सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यक्तिमत्त्व विकास यांची प्रभावी रुजवण केली आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, आपत्ती व्यवस्थापन, मतदार जनजागृती, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास रिअर अॅडमिरल आशिष भार्गव (ADG-A, NCC Headquarters), मेजर जनरल विकास भारद्वाज (VSM), मेजर जनरल (डॉ.) जे. के. एस. परिहार, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूशन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. के. शर्मा, एअर इंडियाचे पायलट कॅप्टन गौरव राठोड तसेच एनसीसी अल्युमनी क्लबचे अध्यक्ष गिरीश निशाणा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी डॉ. लाड यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीही लेफ्टनंट डॉ. लाड यांना Best Platoon Commander Award (Officers Training Academy), आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट ANO पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘NCC Achievers Award–2026’ हा त्यांच्या सेवाकार्यातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मान मानला जात आहे.
या यशाबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, सचिव प्रा. डॉ. मालतीताई आहेर, उपप्राचार्य बी. के. रौंदळ, ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नाशिकचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल एम. एस. किरौला, लेफ्टनंट कर्नल कनिष्क गौर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, एनसीसी अधिकारी, माजी कॅडेट्स तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
